औरंगाबाद : गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत ग्रामीण भागाच्या भक्कम आधारावर खैरेंनी दिल्ली काबीज केली. त्याच ग्रामीण भागातून आता बदलतोय माहोल सारा खैरेंना विसरा अशी कुजबुज कानी पडू लागली आहे. हक्काचे कन्नड, वैजापूर, गंगापूर तालुकेच वजाबाकीत जात असल्याने खैरेंच्या पायाखालची वाळूच सरकली असे बोलले जाते. गेल्या वेळी तब्बल १ लाख ३० हजारांची लीड देणारे हे तीन तालुके विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे निवडणुकीतील रंगत अधीकच वाढली. गेल्या दोन निवडणुकीचे विश्लेषण केले तर 2009 साली उत्तमसिंह पवारांच्या विरोधात खैरेंना कन्नड (२२१४१)वैजापूर(१३७१३) आणि गंगापूर (३२५४) या तीन तालुक्यातून 56 हजारांची लीड होती. 2014 च्या निवडणुकीत याच तीन तालुक्यांनी खैरे बाबांच्या पदरात तब्बल 1 लाख 30 हजार मतांचे भरभरून दान टाकले होते. वैजापूर तालुक्याने सर्वाधिक ४९ हजार ०५८, कन्नड ४१,५३६ तर गंगापूर तालुक्याने ४० हजार ६०५ एवढी लीड दिली होती. मतांचे भरभरून दान टाकणाऱ्या तीन तालुक्यांनी यावेळी पाठ फिरवली आहे. कन्नडचे भूमिपुत्र हर्षवर्धन जाधव यांचे ट्रॅक्टर तालुक्यात जोरात पळू लागले. गंगापूर तालुका सुभाष झांबड यांनी पिंजून काढला. वैजापुरात विरोधी पक्षाचा आमदार असल्याने खैरे विरोधातील नाराजीचा फायदा उठवण्यात येतोय. गेल्या वेळी कन्नड तालुक्याने 41 हजार, वैजापूर 49 तर गंगापूर तालुक्याने 40 हजारांची लीड खैरेंना दिली होती. यावेळी मात्र चित्र अगदी उलट दिसते.
शहर ग्रामीण फिफ्टी-फिफ्टी
औरंगाबाद लोकसभेतची रचना अतिशय रंजक आहे. तीन मतदारसंघ ग्रामीण तर तीन मतदारसंघ शहरी आहेत. शहरी पश्चिम वगळता पूर्व आणि मध्य मतदार संघाने खैरेंना कधीही लीड दिली नाही. गेल्या वेळी पश्चिम मतदारसंघ पाठीशी उभा राहिला असला तरी यावेळी मात्र उलट चित्र दिसेल असे बोलले जाते. खैरेची मदार याच तीन ग्रामीण तालुक्यांवर आहे. विरोधकांनी याच तालुक्यांना लक्ष केले. शहर पाठीशी नाही अन ग्रामीण भागाने यावेळी पाठ फिरवल्याने खैरे पार घायाळ झालेत. हक्काचे तालुके हात तर दाखवणार नाही ना ! या चिंतेने सेनेच्या गोटात अस्वस्थता आहे.